मुंबई- साकीनाका पोलिसांच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या पत्नीचा तिच्या माजी प्रियकरासोबतचा फोटो पाठविण्यात आला. याप्रकरणी त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली असून, याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत असलेल्या सदर व्यक्तीचा या मार्च महिन्यात विवाह झाला आहे. त्याला १६ नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्राम खात्यावर अनोळखी व्यक्तीने फोटो पाठवला. यात त्याची पत्नी अन्य पुरुषासोबत कथितपणे आक्षेपार्ह स्थितीत होती. ते पाहून त्याला धक्का बसला आणि त्याने घरी गेल्यावर याबाबत त्याच्या पत्नीला विचारणा केली.
पत्नीने फोटोतील व्यक्ती तिचा माजी प्रियकर असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी तिच्या माजी प्रियकराला फोटोबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने तो फोटो शेअर केला नसल्याचे स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर तो मोबाइलदेखील त्याने काही महिन्यांपूर्वी विकल्याचे सांगितले. त्यामुळे या पती- पत्नीच्या चिंतेत अधिकच वाढ होऊन अखेर त्यांनी मित्रांच्या सल्ल्याने साकीनाका पोलिस ठाणे गाठले.
मेसेज आणि खाते केले डिलीट-
साकीनाका पोलिस ठाण्याचे निरीक्षक तसेच तपास अधिकारी धीरज गवारे यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, तो मेसेज तसेच ते खाते हे दोन्ही पाठविणाऱ्याने डिलीट केले आहे. त्यानुसार ते बनावट असून सदर प्रकार हा सूड उगवण्याच्या उद्देशाने करण्यात आला असावा असा आम्हाला संशय आहे. त्यानुसार आम्ही अधिक तपास करत आहोत असे त्यांनी नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"