कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील अनाथालयातून बिबट्या पळून गेल्याचे उघडकीस आले आहे. मागील 24 तासांपासून या बिबट्याचा शोध घेणे सुरू आहे. या दरम्यानच प्राणीसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर आणखी एक प्रकार उघडकीस आला. पोलीस नसतानाही स्वतःच्या चार चाकी वाहनावर पोलीस असल्याची नेमप्लेट लावून फिरणाऱ्या एका तोतयाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
या तोतयाकडे विचारपूस करत असताना त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुखी केली.. त्यानंतर मात्र या पोलीस कर्मचाऱ्याने या तोतया व्यक्तीची चांगलीच धुलाई केली. हा संपूर्ण प्रकार मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला..
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, प्राणी संग्रहालयातील अनाथालयातून बिबट्या पसार झाल्याने त्याची शोध म्हणून सुरू होती. संग्रहालयाची कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे जवान या बिबट्याचा शोध घेत होते. याच दरम्यान एक चार चाकी वाहन प्राणीसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर आले. त्याच्यावर पोलीस असे लिहिले होते. आतील चालकाने आपण पोलीस असून आत मध्ये जाऊ द्या असे सांगितले.
दरम्यान प्रवेशद्वारावर असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला त्याचा संशय आला. त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र त्याचे बिंग फुटले. तरीही त्याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी केली. इतकेच नाही तर धक्काबुक्की केली. त्यानंतर मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी या तोतयाची चांगलीच धुलाई केली. आणि शेवटी त्याला ताब्यात घेण्यात आले.