जालना : अपघाताच्या गुन्ह्याचा तपास स्ट्रॉंग करण्यासाठी पाच हजार रूपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी ताब्यात घेतले. अच्युत गोब्रा पवार (५७ रा. योगेशनगर, जालना) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
तक्रारदार महिलेच्या नातवाचा अपघात झाला होता. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सदर गुन्ह्याचा तपास पोलीस कर्मचारी अच्युत पवार यांच्याकडे होता. सदरील गुन्ह्याचा तपास स्ट्रॉंग करण्यासाठी पोलीस कर्मचारी अच्युत पवार यांनी तक्रारदार महिलेकडे पाच हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार महिलेला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संशयिताच्या घरातच सापळा लावला.
यावेळी संशयिताने पाच हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाले. पथकाने अच्युत पवार यांना अटक केली आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर, पोलीस कर्मचारी गजानन घायवट, गजानन कांबळे, गणेश बुजाडे, प्रविण खंदारे यांनी केली.