मार्रा- पिळर्ण येथील होरिझन्स आझूरा व्हिला प्रकल्पातील एका व्हिलाचे मालक निरोथम सिंग (निम्स) ढिल्लोंया वृद्ध हॉस्पिटिलिटी व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी गेस्ट असलेल्या संशयित युवतीशी केलेल्या गैरवर्तनातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पर्वरी पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान दोन्ही संशयितांना सोबत घेऊन पोलीस गोव्यात दाखल झालेआहेत.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे चुलत भाऊ असलेल्या निम्स यांची दोन दिवसांपूर्वी हत्या करून नंतर पळ काढण्याचा प्रकार घडलेला. त्यानंतर रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता. त्यांच्या मृतदेह संशयास्पद स्थितीत बेडवर तेथील कामगारांना आढळून आलेला. मृतदेहावरील दागिने, मोबाईल व तेथील रेंट अकारही गायब झाल्याचे आढळून आले होते. निम्स यांच्या शरीरावर जखमाही आढळल्या होत्या. घटनेनंतर व्हिलाचे व्यवस्थापक सीमा सिंग यांनी पर्वरी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
निम्स यांचा खून करुन पळून जाणाऱ्या संशयित जितेंद्र साहू (३२ वय भोपाळ) तसेच नीतू राहुजा ( वय २२ भोपाळ ) यांना नवी मुंबई गुन्हे शाखेने टोलनाक्यावर अटक केली होती. त्यानंतर दोघांनाही पर्वरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. हत्या करून चोरलेल्या मुद्देमालातील ४७.८२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांनाही सोबत घेऊन पर्वरी पोलीस गोव्यात दाखल झाले आहेत. पर्वरी पोलिसांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री या व्हिलात निम्स यांना भेटण्यासाठी काही गेस्ट आले होते. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत तेथे पार्टी सुरु होती. पार्टी नंतर रविवारी सकाळी निम्स यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता.
चोरलेल्या कारीमुळे संशयित जोडपे पोलिसांच्या तावडीत सापडले. ज्या कारीतून संशयित पळून गेले होते त्या कारच्या मालकांनी कारवर जीपीएस जीपीएस बसवला होता. आपली कार गोव्याबाहेर मुंबईच्या दिशेने जात असल्याची माहिती कार मालकाने पर्वरी पोलिसांना दिली. पर्वरी पोलिसांनी तातडीने वाशी मुंबईतील पोलिसांशी संपर्क साधून कारचा तपशील सादर केला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. संशयितानां प्रथम वैद्यकिय तपासणीसाठी गोवा महाविद्यालयात नेण्यात येणार असून नंतर रिमांडसाठी त्यांना न्यायालयात दाखल केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्ये मागचे कारण त्यांची चौकशी केल्यानंतर स्पष्ट होईल अशी माहिती उपअधिक्षक विश्वेश कर्पे यांनी दिली. तसेच या हत्तेत तिसऱ्या व्यक्तीचा हात आहे किंवा नाही यावर तपासा अंती प्रकाश पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.