मुंबई : कौन बनेगा करोडपतीमध्ये कोट्यवधीच्या बक्षिसाच्या अमिषाने तोतया सीबीआय अधिकाऱ्याने एका व्यक्तीची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आता सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झालेली व्यक्ती तमिळनाडूची रहिवासी असून तिने पंतप्रधान कार्यालयाकडे लेखी निवेदन पाठविले होते. पंतप्रधान कार्यालयाने त्याची दखल घेत ते प्रकरण सीबीआयकडे पाठवले.
केबीसी मुंबई आणि केबीसी कोलकाता या दोन कंपन्यांकडून बक्षीस मिळाल्याचे तक्रारदाराला सांगण्यात आले. यापैकी केबीसी मुंबईकडून १५ कोटी ६० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार असल्याचे प्रलोभनही दाखवण्यात आले. त्याचपाठोपाठ केबीसी कोलकाता येथून सुरुवातीला ७५ लाख रुपयांचे आणि त्यानंतर २ कोटी ७५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाल्याची माहिती त्यांना देण्यात आली.
तोतया अधिकारी नंदिनी शर्मा हिने सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत स्वतःचे ओळखपत्र आणि पंतप्रधानांचे छायाचित्र त्याला पाठवले. यावेळी तिने बक्षिसाबाबत मदत करण्याच्या बहाण्याने त्या रकमेवरील कर आणि सीबीआय सिक्युरीटी चेकसाठी काही पैसे आगाऊ भरण्यास सांगितले. त्यानंतर तिने २०२२ ते २०२३ या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने २ लाख ९१ हजार रुपये तक्रारदाराकडून उकळले.