राजकुमार जाेंधळे, अहमदपूर (जि. लातूर): पिग्मी एजंटावर पाळत ठेवत चाकूहल्ला करून तिघांनी लाखाची राेकड लुटल्याची घटना अहमदपुरात शनिवारी रात्री ११:३० ते १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने अहमदपुरात एकच खळबळ उडाली. वाटमारीत गंभीर जखमी झालेल्या एजंटावर लातुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अहमदपूर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी अच्युत अशाेकराव शेळके (वय ३४, रा. तळेगाव, ह.मु. टेंभुर्णी राेड, अहमदपूर) हे गत १७ वर्षांपासून अहमदपुरात विविध बॅंकांचे पिग्मी एजंट म्हणून काम करत आहेत. सध्या ते लक्ष्मी अर्बन बॅंकेचे पिग्मी एजंट म्हणून पिग्मी गाेळा करतात. ते नेहमीप्रमाणे अहमदपुरातील व्यापारी, गुंतवणूकदारांकडून पिग्मीचे पैसे गाेळा करून शनिवारी रात्री ११:३० ते १२ वाजण्याच्या सुमारास घराकडे दुचाकीवरून (एम.एच. २४ ए.क्यू. ४०४५) जात हाेते. दरम्यान, पाठीमागून आलेल्या तिघा दुचाकीस्वारांनी त्यांची दुचाकी वाटेत अडवली.
यावेळी पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न सुरू झाला. अच्युत शेळके यांनी बॅग गच्च धरून ठेवली असता, त्यांच्या चेहऱ्यावर, पाेटावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केले. बॅगमधील ५०० रुपयांच्या नाेटांचे दाेन बंडल (एकूण १ लाख रुपये) घेऊन तिघे पसार झाले. हा थरार शनिवारी रात्री उशिरा टेंभूर्णी राेडवर घडला. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात गुरनं. ५७७ / २०२३ कलम ३९४, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पाेउपनि. व्ही.पी. सूर्यवंशी करत आहेत.
जखमी एजंटला लातूरला हलविले...
घटनेची माहिती कुटुंबियांना दिल्यानंतर जखमीला उपचारासाठी अहमदपूर रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डाॅक्टरांनी त्यांना लातूरला पाठविले. शासकीय रुग्णालयात उपचार करून, अधिक उपचारासाठी लातुरातील हाळणीकर हाॅस्पिटलमध्ये रविवारी दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
पाळत ठेवून केली लूटमार...
तिघांनी पाळत ठेवून पिग्मी एजंट शेळके यांना लुटल्याचा संशय आहे. अहमदपुरात शेळके हे दरराेज किमान ५० हजारांची पिग्मी गाेळा करतात. आज त्यांच्या बॅगमध्ये जवळपास दीड लाखांची राेकड हाेती. यासाठी तिघांनी पाठलाग करून, शनिवारी रात्री चाकूहल्ला केल्याचे समाेर आले.