बीड : ऑनलइन शॉपिंग ॲपकडून तुम्हाला गिफ्ट दिले जाणार आहे, असे सांगून बँक लिपिकेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर जीएसटी भरायला लावून नंतर खात्यातील रक्कम ऑनलाइन लंपास केली. १२ नोव्हेंबरला शहरातील एकनाथनगरात हा प्रकार उघडकीस आला.
प्रियंका कुमारी नवनीत सत्यम (रा.आळंदी रोड, रिव्हर रेसिडेन्सीजवळ, मुळशी, पुणे, हमु. एकनाथनगर, बीड) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या एसबीआयच्या राजुरीवेस शाखेत लिपिकपदी कार्यरत आहेत.आठ महिन्यांपूर्वी त्यांनी ऑनलाइन खरेदीसाठी माय ग्लॅम हे ॲप डाऊनलोड केलेले आहे. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता त्यांना ऐश्वर्या अग्रवाल नावाच्या मुलीचा फोन आला. तिने माय ग्लॅममधून बोलत असल्याचे सांगितले.
तुम्ही आमच्या ॲपद्वारे सतत ऑनलाइन शॉपिंग करता म्हणून तुम्हाला गिफ्ट मिळाले आहे, त्यासाठी तुम्हाला ४ हजार ९९९ रुपयांची शॉपिंग करावी लागेल असे सांगितले. गिफ्टच्या मोहापायी प्रियंका सत्यम यांनी होकार देत ५ हजार ७९ रुपयांच्या वस्तूंची खरेदी केली. फसवणूक झाल्याने लक्षात आल्यावर त्यांनी शिवाजीनगर ठाण्यात धाव घेतली. एकूण १ लाख१७ हजार ८६३ रुपयांच्या फसवणूक प्रकरणी चार अनोळखी भामट्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला. पो.नि.केतन राठोड तपास करत आहेत.
जीएसटीच्या नावाखाली चारवेळा उकळली रक्कमगिफ्टची रक्कम ५४ हजार ६९० रुपये एवढी असल्याचे सांगून जीएसटीचे ९ हजार ८४४ रुपये शुल्क एका खात्यात भरायला लावले. मात्र, जीएसटीचे पैसे मिळाले नाहीत म्हणून सांगितले गेले. चार टप्प्यात प्रियंका यांच्याकडून ३९ हजार ३७६ रुपये उकळले. जीएसटीची रक्कम परत करण्यासाठी तुमच्या खात्यात किमान ५० हजार रुपये हवेत असे सांगितल्याने प्रियंका यांनी स्वत:च्या खात्यात तेवढी रक्कम जमा केली. मात्र, नंतर त्यांच्या खात्यातून ४८ हजार ४८४ रुपये कपात झाल्याचा मेसेज त्यांना आला.