सिंधुदुर्ग : रिक्षा भाडे म्हणून बसलेल्या परप्रांतीय जोडप्याने पेढा व पाण्यातून गुंगीचे औषध देऊन दोन सोन्याच्या साखळ्या व रोख २३ हजार रुपये लुटून रिक्षाची चावी घेऊन पोबारा केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. तळगाव काटापुरवाडी येथील राजेश सावंत रिक्षा चालकाचे नाव असून त्याने आज याबाबत जबाव सिंधुदुर्गनगरी पोलिसांना दिला आहे.
शुक्रवारी दुपारी सुकळवाड येथून भाडे राजेश सावंत यांच्या रिक्षेत बसून पिंगुळी येथील राऊळ महाराज मठात जोडपे घेऊन गेले होते. तेथे दर्शन घेऊन आल्यावर रिक्षाचालक राजेश यांना प्रसाद म्हणून पेढा दिला. यानंतर प्यायला पाणी दिले. यामुळे कुडाळ भंगसाळ नदीच्या ब्रीज जवळ आल्यावर राजेश बेशुद्ध झाले.
यानंतर यांना काहीच आठवत नाही. परंतु ती रिक्षा हुमरमळा येथे राजेश सावंत यांच्यासह आढळून आली. मात्र यांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या चैनी व रोख २३ हजार रुपये तसेच रिक्षाची चावी गायब झाली असून प्रवासी म्हणून बसलेले जोडपे व यांच्यासोबत असलेली लहान मुलगी गायब आहे, असे राजेश सावंत यांनी पोलिसांना दिलेल्या जबाब नमूद केले आहे.