पुणे : रस्त्यावर रिक्षा लावल्याने टेम्पोला रस्ता ओलांडण्यास जागा नसल्यामुळे टेम्पोचालकांबरोबर भांडणे झाली. त्यात टेम्पोचालकाने छातीत बुक्की मारल्याने एका रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. जैनुद्दीन मोहम्मद नदाफ (वय ४८, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत बशीर मोहम्मद नदाफ (वय ३६, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विमानतळ पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन टेम्पोचालक अमोल नारायण सूर्यवंशी (वय २७, रा. वाघोली) याला अटक केली आहे. ही घटना आपले घर सोसायटीजवळील एस कुमार प्रेमाचा चहा समोर सार्वजनिक रोडवर शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ जैनुद्दीन नदाफ हा रिक्षाचालक असून तो त्यांचा मित्र मतीन बागवान व पुतण्या सुलतान नदाफ हे आपले घरजवळ रस्त्याच्या कडेला रिक्षा लावून रिक्षामध्ये गप्पा मारत बसलेले होते. त्यावेळी विरुद्ध बाजूने आलेल्या टेम्पोला रस्ता क्रॉस करुन जाण्यास जागा नसल्याने त्यांच्यात वाद झाला.
यावेळी टेम्पोचालक अमोल सूर्यवंशी याने शिवीगाळ करुन जैनुद्दीन याच्या छातीत जोरात बुक्की मारली. त्यामुळे जैनुद्दीन हा कळवळला आणि जागीच कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन टेम्पोचालक सूर्यवंशी याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.