लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: भाईंदरच्या एका भंगार व्यावसायिकास गुजरातच्या दोघा भामट्यांनी १ कोटी २६ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भाईंदर पश्चिमेच्या गीता नगर मध्ये राहणारे जगदीश औदीच्य ( ५१ ) यांचा जुने तांबा , पितळ , लोखंड , एल्युमिनियम धातूच्या वायरी व सामान खरेदी करून ते भिवंडी , गुजरात आदी ठिकाणी विक्रीचा व्यवसाय आहे . व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची ओळख गुजरातच्या अहमदाबाद येथील निखिल तलरेजा सोबत झाली होती . सुरवातीचे व्यवहार चांगले झाल्याने दोघांची मैत्री झाली.
तलरेजाने अहमदाबाद येथीलच हिंदू सितला नावाने भंगार खरेदी ची कंपनी चालवणाऱ्या करण महेश रामचंदानीला मोठ्या प्रमाणात भंगार खरेदी करायचे असल्याचे जगदीश यांना सांगितले. निखिल आपला भागीदार असून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करायचा असल्याचे रामचंदाने यांनी जगदीश यांच्या भाईंदर व वसई येथील भंगाराच्या गोदाम पाहणी वेळी सांगितले .
त्या नंतर जगदीश यांनी २४ हजार ७६० किलो तांब्याची वायर रामचंदानी याला पाठवली . मात्र त्याचे १ कोटी २६ लाख २७ हजार रुपये देण्यास तो करणे सांगून टाळाटाळ करू लागला. नंतर त्याचा मोबाईल सुद्धा बंद आला . जगदीश हे मुलगा प्रवीण आणि भागीदार योगेश आमोटा सह अहमदाबाद्ला गेले असता रामचंदानी हा कुटुंबासह राहत्या घरातून निघून गेला होता व तलरेजा सुद्धा सापडला नाही . आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे . सहायक पोलीस निरीक्षक माणिक कतुरे तपास करत आहेत .