मुंबई - दिल्लीतील निक्की यादव हत्याकांड चर्चेत असताना नवी मुंबईत एका सिक्युरिटी गार्डने विवाहित महिलेची हत्या केली आहे. आरोपीचे महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी राजकुमार बाबूराम पाल याला अटक केली आहे. ही महिला सातत्याने लग्नासाठी दबाव टाकत असल्याने तिचा काटा काढल्याचं पोलीस चौकशीत आरोपीनं कबूल केले.
१२ फेब्रुवारीला पोलिसांना एका अज्ञात महिलेचा मृतदेह झुडुपांमध्ये सापडला होता. या महिलेचे वय ३५-४० दरम्यान होते. ओढणीने गळा दाबून महिलेची हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी महिलेचा मृतदेह जंगलात फेकण्यात आला. पोलीस सध्या या प्रकरणाचा शोध घेत आहेत. नवी मुंबई पोलिसांनी या महिलेचा मृतदेह मिळाल्याची माहिती सर्व पोलीस ठाण्यांना कळवली होती. त्यानंतर ट्रॉम्बे पोलिसांनी एक महिला बेपत्ता झाल्याचं रिपोर्ट लिहिला होता. पोलिसांनी तपास केला तेव्हा या बेपत्ता महिलेचाच मृतदेह होता.
पोलिसांनी मृत महिलेच्या पतीशी संपर्क साधला. पतीने सांगितले की, महिला क्लीनर म्हणून काम करायची. काही दिवसांपासून ती बेपत्ता होती. त्यानंतर महिलेच्या फोनची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा तिचे संबंध राजकुमारसोबत असल्याचं समोर आले. राजकुमार हा सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. पोलिसांनी राजकुमारला ताब्यात घेतले. तेव्हा खाकीचा धाक दाखवताच आरोपीने सर्व गुन्हा कबूल केला.
चौकशीत आरोपीने सांगितले की, ही महिला माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. महिलेच्या मागणीला मी कंटाळून गेलो होतो. त्यामुळे तिच्यापासून सुटका व्हावी असा मी प्लॅन आखला. महिलेला भेटण्यासाठी बोलावले. त्याने ओढणीने तिचा गळा दाबून खून केला. हाऊसिंग सोसायटीजवळच असलेल्या झाडात महिलेचा मृतदेह फेकून दिला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करत चौकशीला सुरुवात केली आहे.
काय आहे निक्की हत्या प्रकरण?१४ फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांनी एका गावातील ढाब्यात फ्रीजमध्ये निक्कीचा मृतदेह आढळला. निक्की तिचा बॉयफ्रेंड साहिल गेहलोतसोबत लिव्ह-इनमध्ये राहायची. मात्र साहिलचे लग्न त्याच्या नातेवाईकांनी दुसऱ्या ठिकाणी निश्चित केले होते. यानंतर निक्की आणि साहिलमध्ये भांडण झाले. ९-१० फेब्रुवारीच्या रात्री साहिलने निक्कीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने कारमधून नेले. यानंतर साहिलने वाटेतच तिचा खून करून मृतदेह त्याच्या ढाब्याच्या फ्रीजमध्ये लपवून ठेवला.