सोलापूर: भवानी पेठेत शुक्रवारी दुपारी धक्कादायक घटना समोर आली. एका कत्र्याच्या तोंडातून सात महिन्याचं स्त्री जातीचं अर्भक निसटून पडलं. टीएस चौकातील रहिवाशांनी ते पाहिलं अन् लगेचच पोलिसांना कळविलं. त्या अर्भकाची डीएनए चाचणीव्दारे पुढील तपास केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कापडात गुंडाळलेले स्त्री जातीचे अर्भक शुक्रवारी दुपारी घेऊन जाताना श्वानाच्या तोंडातून ते खाली पडले.
ही घटना परिसरातील टेलर व्यावसायिकाच्या लक्षात आली. त्यांनी तेथील नागरिकांच्या मदतीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती कळताच जोडभावीचे पीएसआय वसंत पवार, हवालदार नितीन भोगशेट्टी आदी हे घटनास्थळी येऊन त्या अर्भकाला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी त्या अर्भकाला मृत घोषित केले. ते अर्भक सहा ते सात महिन्यांचे असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सीसीटीव्हीची मदत-
अर्भक सापडल्याच्या परिसरात नाला व घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे कदाचित हे अर्भक परिसरात टाकण्यात आले होते. तेच श्वानांनी ओढत आणले असावे. ते अर्भक कधी टाकण्यात आले याची माहिती परिसरातील सीसीटीव्हीद्वारे तपासण्यात येत आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
ते अर्भक सहा ते सात महिन्यांचा असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. त्या अर्भकाचे डीएनए चाचणी करण्यात येणार आहे शिवाय याबाबतचा अहवाल आल्यानंतर याबद्दल गुन्हा दाखल करू. - राजेंद्र करणकोट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, जोडभावी पेठ पोलिस ठाणे