कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये पोलिसांनी पती-पत्नीकडून QR कोडद्वारे लाच घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी लाच आणि त्रास दिल्यानंतर सदर व्यक्तीने आपली व्यथा सोशल मीडियावर शेअर केली. ही बाब उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि पोलिसांनी तात्काळ संबंधित पोलिसांवर कारवाई करत त्यांना निलंबित केले.
कार्तिक पात्री असे पीडितेचे नाव आहे. त्याने आपल्यासोबत घडलेली घटना ट्विटरद्वारे शेअर केली. पीडित व्यक्तीने जवळपास १५ ट्विट केले. या ट्विटद्वारे त्याने सर्व घटनाक्रम सांगितली. तो म्हणाला की, मी बंगळुरूमध्ये राहतो. रात्री मी माझ्या पत्नीसह रात्री १२.३०च्या सुमारास मित्राच्या घरातून केक कापून पायी परतत होतो. आमच्या घराजवळ पोहचणार तेवढ्यात पोलिसांची गाडी आमच्याजवळ येऊन थांबली.
पोलिसांच्या गाडीतून दोन पोलीस अधिकारी बाहेर आले आणि आमची चौकशी करु लागले. पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. दोघांनी मोबाईलवर आधार कार्डचा फोटो दाखवला. ओळखपत्र दाखवल्यानंतर पोलिसांनी दोघांचे फोन जप्त केले आणि त्यांची सखोल चौकशी करण्यास सुरूवात केली.
मला आणि माझ्या पत्नीला अनेक प्रश्न विचारल्यानंतर आमच्याकडे पैशांची मागणी केली. रात्री ११ वाजल्यानंतर रस्त्यावर फिरण्यास मनाई असल्याचं सांगत पोलिसांनी आमच्याकडून ३ हजार रुपयांची मागणी केल्याचं पीडित तरुणाने ट्विटरद्वारे सांगितले. मात्र १ हजार रुपये देण्याबाबत बोलणी झाली. यानंतर मी क्यूआर कोडद्वारे पोलिसांना १ हजार रुपये दिल्याचं पीडित तरुणाने सांगितले. मी सदर घटनेबाबत सोशल मीडियावर पोस्ट करण्याबाबत ठरविल्याचं पीडित तरुणाने सांगितले. सदर घटना सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर संबंधित पोलिसांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"