वर्धा: वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (श्या. पंत) येथील सत्याग्रही घाटात झालेल्या एका हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली होती. अनोळखी महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. चारित्र्यावर संशय घेत महिलेला सत्याग्रही घाटात दगडाने ठेचून जिवंत जाळले. जेव्हा पोलिसांनी या 'ब्लाइंड मर्डर मिस्ट्री'चा उलगडा केला. तेव्हा मृतक महिलेच्या पतीसह त्याचा मावस भाऊ गजाआड गेला. ज्योत्सना मनीष भोसले (३२) रा. मंगरूळ चव्हाळा, जि. अमरावती असे मृतक महिलेचे नाव आहे. पोलिसांनी अटक केलेल्यात मनीष भोसले, प्रवीण पवार असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.
१० डिसेंबर २०२२ रोजी सत्याग्रही घाटात अनोळखी महिलेचा जळालेल्या, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणात तळेगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेसह तळेगाव पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे, या हत्याकांडात कुठलाही पुरावा पोलिसांना मिळत नव्हता. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कडवे यांच्या मार्गदर्शनात तब्बल ४० दिवस स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके, तळेगाव पोलिसांच्या २ आणि आर्वी येथील १ अशा एकूण सहा पथकांतील जवळपास ५० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केला. मात्र हाती काहीच लागले नाही.
अखेर मंगरुळ चव्हाळा येथील ज्योत्सना भोसले काही दिवसांपासून वडाळी, अमरावती शहर येथे लग्नासाठी गेल्यानंतर परतली नसल्याने ती मिसिंग असल्याने तिचा शोध अमरावती शहर येथे लग्नासाठी गेल्यानंतर परतली नसल्याने ती मिसिंग असल्याने तिचा शोध अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलिसांकडून सुरु असल्याचे समजले. पोलिसांनी मुंबई येथे राहणाऱ्या ज्योत्सनाची आई आणि नातेवाईकांना तळेगाव पोलिसांत बोलावून घटनास्थळी मिळालेली साडी, चप्पल दाखविल्या असता ते साहित्य ज्योत्सनाचे असल्याचे त्यांनी सांगितले अन् पोलिसांनी तब्बल ४० दिवसांच्या तपासानंतर ब्लाईंड मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करुन आरोपी पती मनीष भोसले आणि प्रवीण पवार यांना अटक करुन बेड्या ठोकल्या.
तीन हजार 'मिसिंग' महिलांची तपासणी
मृतक महिलेची ओळख पटविण्यासाठी मृतकाच्या शरीरावर मिळून आलेल्या दागिने तसेच चपलांवरून पोलिसांनी वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा तसेच मध्यप्रदेश राज्यातील छिंदवाडा, पांढर कवडा, मुलताई, आठनेर बैतुल आदी गावांतील सुमारे तीन हजारांवर मिसिंग असलेल्या महिलांबाबत पोलिस स्टेशन तसेच सीटीझन पोर्टलवर पाहणी करून शोध घेण्यात आला. तसेच बेनटेक्स दागिने विक्रेते, कापड विक्रेते, टेलर व चप्पल विक्रेत्यांकडूनही शाहनीशा केली.
मतदार यादीच्या मदतीनेही घेतला शोध-
पोलिसांनी पेट्रोलपंप, हॉटेल्स, पंक्चर दुरुस्ती दुकाने, हायवेवरील ३५ ते ४० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच विशिष्ट समाजाच्या अनेक ठिकाणच्या तांडे व बेड्यांवर मतदार यादीच्या मदतीने जवळपास दीड ते दोन हजार महिलांची तपासणी करण्यात आली. तसेच आशावर्करकडे असणाऱ्या यादीवरील २०० महिलांची चौकशी करून शोधही पोलिसांनी घेतला.
आरोपी मनीषवर विविध गंभीर गुन्हे दाखल-
आरोपी मनीष भोसले हा मुख्य आरोपी असून याच्यावर जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत, दारुबंदी आदी विविध गंभीर असे दहा गुन्हे यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांत दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता १९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पोलिस तपासात आणखी काय उघड येते याकडे लक्ष आहे.