उल्हासनगर : शासकीय अपंग बालगृहातून गायब झालेल्या एकून ४ अपंग, मूकबधिर, कर्णबधिर व गतिमंद असलेल्या मुला पैकी एक मुलगा मिळाला आहे. तर तीन मुले अद्यापही गायब असल्याची माहिती उघड झाली. पोलीस मुलांचा शोध घेत असल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली आहे. तर बालगृहाचे अधीक्षक प्रवीण दिंडोदे यांनी मुलाचा शोध घेत असल्याचे सांगितले.
उल्हासनगर कॅम्प नं-५, गांधी रोड परिसरात अपंग शासकीय बालगृह असून बालगृहात गतिमंद, कर्णबधिर, मुखबधिर व अपंग असे एकून १० मुले आहेत. १० पैकी ४ मुले बालगृहातून निघून गेल्याचा प्रकार या तीन दिवसात उघड झाला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली. बालगृहाचे अधिक्षक प्रवीण दिंडोदे यांच्यासह सहकर्मचार्यांनी गायब मुलाचा शोध सुरू केला असून ४ पैकी एक मुलगा शुक्रवारी सापडला. तर तीन मुले अद्यापही गायब आहेत. १४ ते १७ वयोगटातील चार मुले बालगृहातून गेल्याचा प्रकार उघड झाल्याने एकच खळबळ उडाली. मुलांना बोलत व ऐकू येत नसून गतिमंद असल्याने त्यांना नीट समज नाही. त्यामुळे त्यांच्या जीविताबाबत काळजी निर्माण झाली आहे.
शहरातील शासकीय अपंग बालगृहात अपंग, कर्णबधिर, मूकबधिर व गतिमंद असलेले एकून १० मुले आहेत. त्यांची व्यवस्थित काळजी घेणे बालगृह प्रशासनाची जबाबदारी आहे. बालगृहाचे आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही. म्हणून ही परिस्थिती ओढविल्याचे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी व्यक्त केले. तसेच याबाबत त्यांच्या वारिष्ठांना याबाबत लेखी पत्र पाठविणार असल्याचे जगताप म्हणाले. मुले गायब झाल्याचे दोन गुन्हे दाखल असून ४ मुला पैकी एक मुलगा सापडल्याची माहिती बालगृहाच्या अधिक्षकाने दिली. मुलाच्या शोधार्थ पोलीस एकजुटले असून मुलाचा लवकरच सुगावा लागणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.