एस. पी. सिन्हा -
रांची : दुचाकीवर भ्रमंतीसाठी निघालेल्या स्पॅनिश महिलेवर झारखंडच्या दुमका जिल्ह्यात शुक्रवारी सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. स्पेनमधील पर्यटक जोडपे बांगलादेशहून दोन दुचाकींवर दुमका येथे पोहोचले. त्यांना तेथून बिहारमार्गे नेपाळला जायचे होते. मात्र, रात्र झाल्यामुळे त्यांनी कुरुमाहाट येथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. तेथील मार्केटजवळ तंबू ठोकून ते विश्रांती घेत होते. तेव्हा स्थानिक तरुणांची त्यांच्यावर नजर पडली. टोळक्याने त्यांना मारहाण करत महिलेवर सामूहिक बलात्कार केला.
पीडितेला रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेत ७ ते ८ तरुणांचा सहभाग होता. त्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर छापेमारी सुरू आहे. न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. विशेष तपास पथकही (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून, आवश्यक ती सर्व कायदेशीर कारवाई केली जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.