डोंबिवली: घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना यातील शंकर भिमराव सुर्यवंशी उर्फ धोत्रे उर्फ चेनाळे ( वय २६) रा. कल्याण, व्दारलीगाव या सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी घरफोडी करताना रंगेहात पकडले. मानपाडा हद्दीतील वझे कंपाऊंड परिसरात भर दुपारी घरफोडी होत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. मात्र पोलिस आल्याची चाहूल लागताच तेथून निसटलेल्या या चोरट्याला तब्बल अर्धातास पाठलाग करून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. चोरट्याकडून चौकशीत मानपाडा, रामनगर, विष्णुनगर पोलिस ठाण्यातील एकूण दहा गुन्ह्यांची उकल झाली असून १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जानेवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. बहुतांश घटना मध्यरात्रीसह दिवसाढवळ्याही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील चार ही पोलिस ठाण्याअंतर्गत तपासकामी विशेष पथके नेमली आहेत. त्याप्रमाणे मानपाडा पोलिस ठाण्यात वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे, सुनिल तारमळे, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक भानुसाद काटकर, पोलिस हवालदार राजेंद्र खिल्लारे, दिपक गडगे, सोमनाथ टिकेकर, सुनिल पवार, गिरीश पाटील, विकास माळी, संजय मासाळ, पोलिस नाईक गणेश भोईर, प्रविण किनरे, महादेव पवार, यलप्पा पाटील, पोलिस शिपाई महेंद्र मंझा, संदीप चौधरी, अशोक आहेर, विजय आव्हाड यांची विशेष पथके नेमण्यात आली आहेत.
दरम्यान २१ फेब्रुवारीला दुपारी २.३० च्या दरम्यान मानपाडा पोलिस ठाण्यात फोन करून इमारतीत चोर घुसून घरफोडी करीत असल्याची माहीती वङ कंपाऊंडमधील एका व्यक्तीने दिली. तत्काळ त्या ठिकाणी वनवे आणि तारमळे यांची पथके रवाना झाली. चोराला पोलिस आल्याची चाहूल लागताच त्याने तेथून पळ काढला आणि एमआयडीसीतील कंपन्यांच्या परिसरातून बचावासाठी धावू लागला. मात्र सबंधित पथकांनी त्याला पाठलाग करून पकडले. अर्धा ते पाऊणतास हा थरार चालू होता. शंकर हा मुळचा कर्नाटकचा रहिवासी आहे. वॉचमन नसलेल्या इमारती हेरुन बंद घरात तो दिवसाढवळयाच घरफोडया करायचा. त्याचा आणखीन एक साथीदार असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.