मनोज शेलार, नंदुरबार: शहर व तालुक्यात चोरी करणाऱ्या तिघांना ‘एलसीबी’ने अटक करून त्यांच्याकडून ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिघांमधील एक म्होरक्या शहरातील मध्यवर्ती भागातील एका कॉलनीत रूम घेऊन राहत होता. दिवसभर घरफोडींसाठी रेकी करणे व रात्री चोऱ्या करणे असे प्रकार तो आपल्या साथीदारांसह करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
हेमंत अनिल सोनवणे (२५, रा. धनेर, ता. साक्री, ह.मु. वेडूगोविंदनगर, नंदुरबार), तुळशीराम ऊर्फ तुळशीदास भिल्लू चौरे (२४, रा. मचमाळ, ता. साक्री), अनिल गणेश पवार (२३, रा. तोरणकुडी, पो. धनेर, ता. साक्री) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, ४५ सौर प्लेट, ७ इन्व्हर्टर, २ सौर प्लेट बॉक्स, ४ बॅटऱ्या, २ एलईडी टीव्ही, हेअर ड्रायर मशीन, एक लोखंडी कटर असा एकूण ९,५०,८७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पेालिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास १० हजार रुपये रोख बक्षीस जाहीर केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, शहादा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलिस निरीक्षक संदीप पाटील, हवालदार राकेश मोरे, दादाभाई मासुळ, किरण मोरे, राजेंद्र काटके, शोएब शेख, अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.