लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी तुर्भे येथून देशी कट्ट्यासह तलवार व जिवंत काडतूस जप्त केले आहेत. हे शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यामद्ये ठाणेच्या एका सराईत गुन्हेगाराचा समावेश आहे. दोन्ही शस्त्रे घेऊन ते कारमधून तुर्भे परिसरात वावरत असताना पोलिसांनी सापळा रचून त्यांच्यावर कारवाई केली आहे.
तुर्भे सेक्टर २३ परिसरात दोघेजण शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक तनवीर शेख, निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक निलेश शेवाळे आदींचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने मंगळवारी रात्री सेक्टर २३ परिसरात सापळा रचला होता. त्यामद्ये संशयित वर्णनाची कार पोलिसांनी अडवून त्यामधील दोघांची झडती घेतली. यावेळी एकाकडे देशी बनावटीचे पिस्तूल व एक काडतूस आढळून आले. तर कारमध्ये एक तलवार देखील आढळून आले. याप्रकरणी तेजस वरेकर (२६) व ओमकार हांडे (२२) यांच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु दोन्ही शस्त्रे घेऊन ते तुर्भे कोणत्या उद्देशाने आले होते याची माहिती त्यांनी पोलिसांना दिलेली नाही. त्यामुळे कोणावर तरी हल्ल्याच्या उद्देशाने ते आले असावेत अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. वरेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ठाणेत चार गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून वापरण्यात आलेली कार व देशी कट्टा, काडतूस व तलवार जप्त करण्यात आली आहे.