अमरावती : चोरीची दुचाकी विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी दर्यापूर येथील बस स्टँड परिसरातून अटक केली. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. या चोरट्यांकडून आणखी काही वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तेजस सुभाष कडू (२४, रा. खुर्माबाद, दर्यापूर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक दुचाकी चोरीच्या तपासात दर्यापूर परिसरात गस्तीवर होते. यावेळी तेजस कडू हा कागदपत्रे नसलेली दुचाकी स्वस्त दरात विक्रीकरिता दर्यापूर येथील बस स्टँड परिसरामध्ये ग्राहक शोधत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याला दुचाकीच्या कागदपत्रांची विचारणा करण्यात आल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसी खाक्या दाखविताच त्याने सदरची दुचाकी ही ग्राम निंभारी येथील संकेत ठाकरे याने पुणे येथून चोरून विक्रीकरिता दिल्याचे सांगितले तसेच दोन वर्षांपूर्वी साथीदार ब्रजेश कुऱ्हाडे (रा. माहुली धांडे) याच्यासह खरपी येथून एक दुचाकी चोरल्याची कबुलीही त्याने दिली. त्यानुसार त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक संजय शिंदे, त्र्यंबक मनोहर, सुनील महात्मे, सय्यद अजमत, सुधीर बावने, नीलेश डांगोरे, अमोल केंद्रे, संजय गेठे यांनी केली.