पुणे : सीमा शुल्क विभागाच्या पुणे विभागातील सात जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षभरात जप्त केलेल्या सुमारे १ हजार ३३ किलोंचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आल्याची माहिती विभागाचे आयुक्त यशोधन वनगे यांनी दिली. या अंमली पदार्थांची किंमत ५ ते ७ कोटी रुपये इतकी असून या कारवाईत ९ घटनांमध्ये १९ आरोपींना अटक करण्यात आली. यात गांज्याचे प्रमाण जास्त असल्याचे वनगे यांनी सांगितले.
२६ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून जगभरात साजरा केला जात असतो. या दिवसाचे औचित्य साधत वनगे पत्रकारांशी बोलत होते. सीमा शुल्क आयुक्तालयातील अमली पदार्थ विरोधी विभागाने एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत जवळपास ९ प्रकरणांमध्ये सुमारे १ हजार ३३ किलो अमली पदार्थ जप्त केले. या अंमली पदार्थांची विल्हेवाट रांजणगाव (ता. शिरूर) येथील एका ठिकाणी लावण्यात आली. या प्रकरणी १९ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून गांजा, चरस, कोकेन, मेफेड्रॉन यासारखे अमली पदार्थ जप्त केले. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यात जिल्ह्यांत ही कारवाई करण्यात आल्याचे वनगे यांनी सांगितले.
दरम्यान केंद्र सरकारने १२ ते २६ जून हा पंधरवडा नशामुक्त पंधरवडा जाहीर केला आहे. या मोहिमेंतर्गत सीमा शुल्क आयुक्तालयाने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अंमली पदार्थविरोधी सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थ आणि त्याचे दुष्परिणाम या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.