नोएडा - आधुनिक तंत्रज्ञान आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका युवकाचा जीव वाचला आहे. इन्स्टाग्रामकडून मिळालेल्या अलर्टनंतर पोलिसांनी तातडीने पाऊले उचलली त्यामुळे २० वर्षीय युवक बचावला. नोएडा येथे राहणाऱ्या युवकाने फासाचा फोटो शेअर करत आज मी संपणार अशी पोस्ट शेअर केली. या पोस्टनंतर इन्स्टाग्रामनं अलर्ट जारी केला. हा अलर्ट उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ येथील पोलीस मुख्यालयाला मिळाला.
हा अलर्ट मिळताच पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत युवकाचा फोन नंबर आणि आयपी एड्रेस शेअर केला. मुख्यालयाने त्वरीत नोएडा येथे संपर्क साधत सायबर सेलला युवकाचे लोकेशन ट्रेस करण्यास सांगितले. त्यानंतर सायबर पोलिसांनी युवकाचा पत्ता शोधून काढत त्याठिकाणी पोलिसांचे एक पथक पाठवले. परिसरात पोहचल्यानंतर पोलिसांनी जवळपास ५० घरांचे दरवाजे ठोठावले. पोलीस सातत्याने युवकाच्या मोबाईलवर फोन करत होते. २० वेळा फोन केल्यानंतर युवकाने फोन उचलला. पोलिसांनी या युवकाला त्यांच्या बोलण्यात व्यस्त ठेवले. तेव्हा पोलिसांचे दुसरी टीम युवकाच्या घरी पोहचली आणि त्यांनी युवकाला ताब्यात घेतले. या युवकाचं समुपदेशन पोलिसांकडून करण्यात आले. बायकोशी भांडण झाल्यामुळे युवक मानसिक तणावाखाली असल्याचं उघड झाले.
पोलिसांनी त्या युवकाला समुपदेशनासाठी पोलीस ठाण्यात आणले. काही वेळ समजावून सांगितल्यानंतर त्याला परत पाठवण्यात आले. युवकाच्या सासरच्यांनाही बोलवण्यात आले होते. पोलिसांचे पथक या तरुणावर काही दिवस लक्ष ठेवणार असून गरज पडल्यास पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला जाईल. या प्रकारानंतर नोएडाचे आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी पोलिस विभागाच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक केले आणि त्यांचा सन्मान करण्याची घोषणा केली.
गेल्या वर्षी मार्चमध्ये, यूपी पोलिसांनी मेटासोबत एक करार केला होता, ज्या अंतर्गत फेसबुक आणि इंस्टाग्रामवर कोणतीही संशयास्पद पोस्ट किंवा टिप्पणी आढळल्यास त्वरित अलर्ट जारी केला जाईल. गुन्हेगारी आणि आत्महत्या रोखणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. या वर्षी ३१ जानेवारी रोजी पोलिसांनी गाझियाबादमधील तरुणाचे प्राण वाचवले होते, ज्याने लाइव्ह व्हिडिओ शेअर करून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होते.