लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : इंदूर आणि कोलकाता येथे झालेल्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मुंबई आणि विरार येथून तीन जणांना अटक केली आहे. याप्रकरणी चार आरोपींना संबंधित राज्यांतून यापूर्वीच अटक केली आहे. ही दोन्ही स्वतंत्र प्रकरणे असून एकूण १४ किलो सोन्याची तस्करी पकडली गेली असून याची किंमत ८ कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणी एकूण सात जणांना अटक झाली आहे.
८ जून रोजी छत्तीसगडमधील रायपूर रेल्वेस्थानकातून सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती ‘डीआरआय’ अधिकाऱ्यांना मिळाली होती. तेथे छापेमारी केली असता अरविंद व रोहित राजपुरोहित या दोघांकडे २ कोटी २० लाख रुपये किमतीचे ३.६ किलो सोने आढळून आले. त्यांची चौकशी केली असता ते सोने तस्करी कोलकात्ता येथून त्यांच्यापर्यंत आले होते व ते सोने मुंबईत श्रीपाल जैन व आसित मोंडल यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या माहितीच्या आधारे मुंबईत छापेमारी केली असता ४.८ किलो सोने पकडण्यात आले. याची किंमत २ कोटी ७० लाख इतकी आहे.
दुसऱ्या प्रकरणात, विरार येथून इंद्रमणी राम या व्यक्तीलाही सोन्याच्या तस्करीप्रकरणात ‘डीआरआय’नेच अटक केली आहे. कोलकात्यातून ५.६ किलो सोने तस्करीच्या माध्यमातून आले होते. याची किंमत ३ कोटी ४० लाख इतकी होती. इंद्रमणी राम याच्या सूचनेवरून हा सर्व व्यवहार सुरू होता, अशी माहिती कोलकात्यातील डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या आधारे त्यांनी ही कारवाई केली.