बुलढाणा : वन्य जीवांचे छायाचित्र घेण्यासाठी वनविभागाकडून लावण्यात आलेला जीपीएस रिडींग सिस्टीमचा ट्रॅप कॅमेरा अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. हा प्रकार तारापूर नियत क्षेत्रामध्ये घडला. याप्रकरणी वनपालांच्या तक्रारीवरुन ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मोताळा परिक्षेत्रात वनपाल म्हणुन कार्यरत असलेल्या शिला श्यामकुमार खरात (४१) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, तारापूर नियत क्षेत्रामध्ये वन्य जीवांचे छायाचित्र घेण्यासाठी आणि वन संरक्षणासाठी ज्ञानगंगा अभयारण्यांमध्ये २२ मार्च रोजी एकुण आठ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्या कॅमेऱ्यामध्ये मेमरी कार्ड, सेल आदी वस्तु टाकण्यात आल्या होत्या. दरम्यान, ३० मार्च रोजी या भागात गस्त सुरु असाना जीपीएस रिडींग सिस्टींमचा ट्रॅप कॅमेरा दिसून आला नाही. याबाबत इतरत्र शोध घेतला असता आढळून न आल्याने चोरट्याने हा कॅमेरा चोरुन नेल्याचा अंदाज आहे. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात ४ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीवरुन ग्रामीण पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.