मुंबई : सोशल मीडिया प्रोफाइल हॅक करून व्हायरल केली जात असल्याचा दावा करत एका तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील एका बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट कंपनीत काम करणाऱ्या या तरुणीने तिच्या एफआयआरमध्ये दावा केला आहे की, तिचे सोशल मीडिया प्रोफाइल हॅक करण्यात आली होते आणि तिच्या चॅट्समध्ये बदल करण्यात आले होते, ज्यामुळे तिचा होणारा नवरा आता लग्न मोडण्याची धमकी देत आहे.
जोगेश्वरी पोलिसांनी 25 मार्च रोजी बदनामी केल्याबद्दल भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. तरुणीने सांगितले की, 2018 मध्ये काही लोकांनी तिचे नाव आणि फोटो वापरून बनावट इंस्टाग्राम अकाउंट बनवले होते, त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि अकाउंट ब्लॉक केले होते.
तरुणीने सांगितले की, तिचे फेसबुक प्रोफाईल जानेवारी 2022 मध्ये हॅक झाले होते आणि या वर्षी मार्चमध्ये ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी तिचे जीमेल खाते हॅक केले होते, तिच्या खाजगी चॅट्समध्ये प्रवेश केला आणि ते चॅट्स तिला ओळखणाऱ्या लोकांना फॉरवर्ड केले. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, चॅट्स तिच्या होणाऱ्या नवऱ्यापर्यंतही पोहोचले, जो आता त्यांचे लग्न मोडण्याची धमकी देत आहे.
तरुणीने पोलिसांना सांगितले की, तिला या हॅकमागे एक माजी सहकारी असल्याचा संशय आहे. त्या सहकाऱ्याने तिला प्रपोज केले होते, पण तिने त्याला नकार दिला होता. त्यामुळे तो तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, सायबर पोलीस आणि टेक्नॉलॉजीची मदत घेत असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.