अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुंबईसह पाच जिल्हयातून हद्दपार केलेल्या शंकर अशोक ढोकणे (२१, रा.अंबिकानगर, वागळे इस्टेट, ठाणे) या आरोपीला वागळे इस्टेट परिसरातून अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी शनिवारी दिली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी शंकर याच्याविरुद्ध हाणामारीसह अनेक गुन्हे वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांवर अटकाव करण्यासाठी वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी त्याला ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरे या तीन जिल्हयातून एक वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश ८ सप्टेंबर २०२३ रोजी दिले होते. परंतू, शंकर याने या मनाई आदेशाचा भंग करुन पोलिस उपायुक्तांच्या परवानगीशिवाय वागळे इस्टेट परिसरात मोकाट फिरत असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांना मिळाली.
त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवरील पोलिस पथकाने २९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अंबिकानगर क्रमांक दोन भागातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.