श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : श्रीरामपूर नेवासे मार्गावर खोकर फाट्याजवळ ट्रॅक्टर चालकास कारमधून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी डोक्याला हत्यार लावून ट्रॅक्टर पळवून नेला. ट्रॅक्टर चालकाला कारमध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेऊन सोडले.
याप्रकरणी किशोर दत्तात्रय धिरडे (वय ३५, रा.भेर्डापूर, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. १९ फेब्रुवारीला रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. महांकाळवाडगाव येथून ट्रॅक्टरमध्ये ऊस भरून धिरडे हे अशोकनगर कारखान्याकडे चालले होते. खोकर फाट्याजवळ ट्रॅक्टर पंक्चर झाल्यामुळे त्यांनी तेथे थांबून घेतले. रस्त्याच्या बाजूला ट्रॅक्टर लावला. रस्त्याने येणाऱ्या अन्य ट्रॅक्टर चालकाशी धिरडे यांनी संपर्क साधत मदत मागितली. मात्र, त्याच वेळी टाकळीभानहून एक काळ्या रंगाची कार आली. ट्रॅक्टरजवळ थांबून त्यातील चारजण उतरले. त्यांचे चेहरे कापडाने बांधलेले होते. त्यातील दोघा जणांनी धिरडे यांना पकडले.
पोटाला व डोक्याला काहीतरी हत्यार लावून कारमध्ये बळजबरीने बसविले. ट्रॅक्टरची चावी हिसकावून घेत एकाने ट्रॅक्टर चालू करून पळवून नेला. अन्य आरोपींनी कारमध्ये बसवीत अशोकनगरफाटा मार्गे निपाणीवाडगाव जवळ आणून सोडले. त्यांनी धिरडे यांच्या जवळचा मोबाईलही काढून घेतला. यानंतर धिरडे यांनी नातेवाइकांना येथे बोलवून घेतले. पोलिसांना याबाबत माहिती कळविण्यात आली. चारही चोरटे २५ ते ३० वर्षे वयाचे होते. चोरट्यांनी अडीच लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, तसेच दोन हजारांचा मोबाईल लुटून नेल्याची फिर्याद धिरडे यांनी दाखल केली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.