नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी एका व्यक्तीनं ७० हजारात स्वत:च्याच पत्नीला खरेदी केले. त्यानंतर महिला न सांगता सारखे माहेरी जायला लागली तेव्हा रागाच्या भरात त्याने तिची हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह कुणालाही सापडू नये असा प्लॅन बनवला आणि जंगलात फेकून दिला.
पोलिसांनी या घटनेत आरोपी पतीला अटक केल्यानंतर हत्येचा खुलासा झाला. डीसीपी चंदन चौधरी म्हणाले की, शनिवारी पोलिसांना एक कॉल आला, कॉल करणाऱ्या व्यक्तीने दिल्लीच्या फतेहपूर बेरी जंगलात अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती दिली. तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचली आणि त्यांनी हा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी महिलेची ओळख पटवून तपासाला सुरुवात केली.
पोलिसांनी सुरुवातीला जंगलाच्या दिशेने येणाऱ्या सर्व वाहनांची सीसीटीव्ही फुटेजद्वारे पडताळणी सुरू केली. तर दुसरीकडे तंत्रज्ञानाचा आधार घेत तपासणी केली असता त्याच परिसरात शनिवारी रात्री १.४० वाजता एक ऑटो आली होती हे कळालं. त्यानंतर ऑटोचा नंबर ट्रेस करत त्याचा पाठलाग केला. ऑटोचालक दिल्लीच्या छतरपूर येथील बांध रोड परिसरात राहत होता. पोलिसांनी ऑटोचालकाला ताब्यात घेत चौकशी केली तेव्हा त्याने रहस्य उलगडले. ऑटोचालकनं म्हटलं की, ज्या महिलेचा मृतदेह आहे तिचं नाव स्वीटी आहे. ती धरमवीर नावाच्या व्यक्तीची पत्नी होती.
धरमवीर हा अरुणचा नातेवाईक होता. त्याने आणि अन्य एका सहकाऱ्याने मिळून स्वीटीची हत्या केली. तिघांनी दिल्ली हरियाणा बॉर्डरजवळील नांगलोई परिसरात गळा दाबून स्वीटीचा मर्डर केला. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. अरुणला जंगलाबाबत खूप काही माहिती होते. त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अरुणने हे जंगल निवडले. धरमवीर हा पत्नीच्या वागणुकीमुळे त्रस्त झाला होता. स्वीटी बऱ्याचदा न सांगताच माहेरी निघून जायची. स्वीटीला ७० हजारात धरमवीरने खरेदी केले होते. त्यामुळे तिच्या कुटुंबाबद्दल त्याला काही माहिती नव्हते. स्वीटीनेही त्याला कुटुंबाबद्दल काही सांगितले नाही. केवळ ती बिहारच्या पटना येथे राहायला होती इतकेच माहिती होते.
पोलीस या घटनेचा तपास करत आहे. पोलिसांनी धरमवीर, अरुणसह अन्य एकावर हत्येसह पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली ऑटोही पोलिसांनी जप्त केली. स्वीटीला रेल्वे स्टेशनला सोडू असं सांगून तिला सोबत घेतले होते. पोलीस आता त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत ज्याच्याकडून धरमवीरने स्वीटीला खरेदी केले होते. त्याचसोबत अनेकदा महिनो महिने घरापासून दूर राहून स्वीटी कुठे जायची हादेखील मोठा प्रश्न आहे.