पारोळा जि.जळगाव : २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून एका महिलेला पावणेदोन लाख रुपयात ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. हे पैसे महिलेस कापूस विक्रीतून मिळाले होते.
टिटवी ता. पारोळा येथील एका महिलेने नुकतीच कपाशी विक्री केली होती. त्यातून त्यांना दोन-अडीच लाख रुपये मिळाले होते. दि. ५ रोजी त्यांना मोबाईल आला. आपणास कोन बनेगा करोडपती स्कीमअंतर्गत २५ लाखांची लॉटरी लागली आहे. त्यासाठी रक्कम वर्ग करण्यासाठी बँक खात्याचा क्रमांक मागितला. यावर महिलेने बडोदा बॅंकेचा खाते क्रमांक दिला.
या घटनेत दीपककुमार, नरेश व सौरभ अशा तीन वेगवेगळ्या व्यक्तींनी सलग दोन दिवस महिलेच्या व्हॉटसअॅपवर भुलथापा दिल्या. यावर महिलेने विश्वास ठेवत १ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन वर्ग केली. दरम्यान, फोन लागत नसल्याने व व्हॉट्सअॅपला प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पारोळा पोलिसात फिर्याद दिल्यावरुन गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.