लोकमत न्यूज नेटवर्क, इस्लामपूर: शहरातील जावडेकर चौक परिसरातील तरुणाचा विवाह करून देताना त्याच्याकडून २ लाख रुपये उकळून देव-देव करण्याच्या नावाखाली लग्न केलेल्या बोगस नववधूला घेऊन जाऊन फसवणूक करणाऱ्या टोळीतील पुण्याच्या महिलेस पोलिसांनी वाघोली येथून अटक केली आहे.फसवणुकीचा हा प्रकार सहा महिन्यांपूर्वी घडला होता.
याप्रकरणी रविंद्र उत्तम जाधव यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे.ज्योती धनंजय लोंढे (वय ३८ वर्षे रा. वाघोली,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या एजंट महिलेचे नाव आहे.येथील न्यायालयाने तिला ७ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.लग्न जमविण्यासाठी असलेले संशयीत एजंट सचिन जगन्नाथ रास्कर (रा. कोळी मळा, इस्लामपूर),अर्चना भरत शिंदे (रा. वाघोली,पुणे),सोनाली रावश्या काळे,अर्चना मास्तर सावंत (दोघे रा. पुणे) आणि बेबीजान बाबु शेख (रा. वाळवा) अशा सहा जणांविरूध्द इस्लामपूर पोलीस ठाण्यात फसवणूकीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,जावडेकर चौकातील तरुणाचा विवाह जमत नव्हता म्हणून त्याने इस्लामपूर शहरातील सचिन रास्कर याच्याशी संपर्क साधल्यावर रास्कर याने पुणे येथील ज्योती लोंढे या महिलेशी संपर्क करून अर्चना या महीलेशी पुणे वाघोली येथे विवाह करून देण्याचे ठरविले.त्याबदल्यात दोन लाख रुपये घेवून विवाह करून दिला.त्यांनंतर नववधू अर्चना ही वराच्या घरी ३ दिवस संसार केल्यावर देव-देव करण्यासाठी माहेरी जातो असे म्हणून निघून गेली. त्यांनतर ती बरेच दिवस परत आली नाही,म्हणून तिचा शोध घेतला असता अर्चना ही लग्न ठरवताना दिलेल्या पत्यावर रहात नसल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर लग्न जुळवणारी महीला ज्योती लोंढे हिच्याकडे चौकशी केली असता तिने मला अर्चनाबाबत काही माहीती नाही असे सांगत कानावर हात ठेवले. शेवटी लग्नाबाबत आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने त्याने पोलीसात फिर्याद दिली.
अशाच प्रकारे या टोळीने बिरणवाडी ता. तासगांव येथील ३१ वर्षीय तरुणाचेसुद्धा लग्न लावून लग्नासाठी १ लाख ६० हज रुपये घेवून अर्चना मास्तर सावंत (पुणे) हिच्याशी लग्न लावून दिले.तीनेसुद्धा वराच्या घरी १३ दिवस संसार केल्यावर माहेरी जातो असे सांगून पोबारा केला.ती पुन्हा परत आलीच नाही.त्यानंतर संबंधित तरुणाने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर लग्न जमविण्यासाठीच्या या टोळीतील वरील सर्वांविरुद्ध फिर्याद दिली.टोळीविरुद्धचा हा दुसरा गुन्हा आहे.पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चंद्रकांत भुसनूर व शरद बावडेकर हे पुढील तपास करीत आहेत.