ठाणे: बाजारपेठेतील एका हॉटेलमध्येसेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिला दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी मंगळवारी दिली. तिच्या ताब्यातून दोन पिडित महिलांची सुटकाही करण्यात आली आहे.
ठाणे शहर परिसरासह वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून पिडित असहाय्य महिलांना फूस लावून त्यांच्याकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याच आधारे १ आॅगस्ट २०२२ रोजी ठाण्यातील जांभळी नाका येथील वैशाली रेस्टॉरन्ट येथे बनावट गिऱ्हाईक पाठवून व वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने छापा टाकाला. त्यावेळी या संपूर्ण प्रकाराचा भंडाफोड झाला. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी दलाल महिलेविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या ताब्यातून दोन पिडित महिलांची सुटकाही करण्यात आली आहे.