मंगेश कराळे
नालासोपारा - वाहतूक महिला पोलिसाच्या अंगावर भरधाव वेगातील दुचाकी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी नालासोपाऱ्यात घडली आहे. या घटनेत महिला पोलिसाच्या हाताला व पायाला दुखापत झाली आहे. नालासोपारा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी वकील दांपत्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक महिला पोलीस प्रज्ञा दळवी (३०) या सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पाटणकर पार्क येथील गोडाऊनवर असताना हा प्रकार घडला आहे. आरोपी वकील ब्रजेशकुमार भेलौरिया (३१) यांची दुचाकी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केल्याने टोईंग करून गोडाऊनमध्ये आणली होती. याच गोष्टींचा राग मनात धरून आरोपी सरकारी जागेत जबरदस्तीने घुसून सरकारी कामात अडथळा निर्माण करून दुचाकी काढून भरधाव वेगाने गोडाऊनच्या मेन गेटवर जोराने आदळली. महिला पोलीस प्रज्ञा यांनी आरोपीला थांबविण्यासाठी प्रयत्न केल्यावर त्यांच्या अंगावर दुचाकी चढवून डाव्या पायास, उजव्या हाताला दुखापत केली. आरोपीने शिवीगाळ करून मी वकील असून तुमची नोकरी खाऊन टाकेन, तुम्ही रिश्वतखोर असून तुम्हाला आता बघून घेतो अशी धमकी देत लोकांच्या समोर मोठमोठ्या आवाजात पोलिसांची प्रतिमा मलिन केली आहे. महिला पोलिसाने आरोपी वकील ब्रजेशकुमार भेलौरिया (३१) आणि त्यांची पत्नी डॉली भेलौरिया (३१) यांच्याविरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.
कोट
सरकारी कामात अडथळा व महिला पोलिसांवर भरधाव वेगात दुचाकी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी वकील दांपत्याला अटक करण्यात आली आहे. - विलास सुपे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे)