असं म्हटलं जातं की, प्रेम आंधळं असते. प्रेमात लोक काहीही करू शकतात. परंतु त्रास तेव्हा होतो जेव्हा हे या प्रेमाचं वेडेपणात रुपांतर होते. हैदराबादमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. जिथं एकतर्फी प्रेमात वेडे झालेल्या युवतीनं युवकाचं अपहरण केले. या प्रकरणात आरोपी युवतीला पोलिसांनी अटक केली आहे. अपहरणातून सुटलेल्या युवकाने राचकोंडा पोलीस आयुक्तांकडे जात या घटनेची तक्रार नोंदवली.
तपासात समोर आलं की, आरोपी युवतीने तिच्या ४ सहकाऱ्यांसोबत मिळून युवकाचं अपहरण केले. युवतीने ४ सहआरोपींना अपहरण करण्यासाठी सुपारी दिली होती. पोलिसांनी जेव्हा आरोपी युवतीला अटक केली. तेव्हा तिने गुन्ह्याची कबुली दिली. परंतु युवकाचं अपहरण का केले हे जेव्हा युवतीने पोलिसांना सांगितले तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. आरोपी युवतीला युवकासोबत लग्न करायचं होतं त्यासाठी त्याचे अपहरण केल्याचं तिने म्हटलं.
हा युवक टीव्ही अँकर आहे. युवतीने याचं अपहरण करण्याचं प्लॅनिंग आखलं. त्यानुसार ४ जणांना युवकाच्या हालचालींवर पाळत ठेवायला सांगितली. या चौघांनी युवकाच्या कारवर ट्रॅकिंग डिवाईस लावले. १० फेब्रुवारीला आरोपींनी युवकाचे अपहरण केले आणि एकाठिकाणी त्याला बेदम मारले. जीवे मारण्याच्या भीतीने टीव्ही अँकर महिलेसोबत बोलण्यास तयार झाला. त्यानंतर युवकाला सोडण्यात आले.
ही युवती सातत्याने टीव्ही अँकरला मेसेज पाठवायची. जेव्हा टीव्ही अँकर प्रणवने तिचा नंबर ब्लॉक केला तेव्हा ती वैतागली. सतत प्रणवकडून दुर्लक्ष होत असल्याने ती नाराज होती. आरोपी तृष्णाला कुठल्याही परिस्थितीत प्रणवशी लग्न करायचंय हे ठरवलं होते. त्यामुळे तिने युवकाच्या अपहरणाचा कट रचला. त्यानंतर युवकाचे अपहरण करून त्याच्याशी लग्न करायचे मग सर्वकाही सुरळीत होईल असं तिला वाटत होते.
डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या तृ्ष्णाने मॅट्रोमोनियम साईटवर प्रणवचा प्रोफाईल पाहिला. त्यानंतर तिने प्रणवचा मोबाईल नंबर शोधला. जेव्हा तिने प्रणवला मेसेजद्वारे संपर्क केला. तेव्हा त्याने कुणीतरी माझ्या फोटोचा गैरवापर केल्याचं म्हटलं. मेट्रोमोनियम साईटवर माझा कुठलाही प्रोफाईल नसल्याचे तो बोलला. साईटवर कुणीतरी बनावट अकाऊंट बनवून त्यावर प्रणवचा फोटो वापरला होता. त्याबाबत प्रणवने सायबर क्राईम पोलीस ठाण्यातही तक्रार केली आहे.