ठाणे : पैशांच्या अमिषाने वागळे इस्टेटमधील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या रोशनी शेख (३५, रा. पालघर) या दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. तिच्या तावडीतून चार पिडित तरुणींची सुटका केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी रविवारी दिली.
गरिब, गरजू मुलींकडून एक महिला दलाल शरिरविक्रयाचा व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे या विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील, उपनिरीक्षक भूषण जाधव यांच्यासह श्रीनगर पोलिस ठाण्याचे हवालदार निलेश धोत्रे आणि निलेश शेडगे आदींच्या पथकाने २४ डिसेंबर रोजी दुपारी ३.२५ वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट रोड क्रमांक १५ येथील साई टच रेस्टॉरंट जवळ सापळा लावला. त्याठिकाणी आलेल्या महिला दलाल शेख हिच्याशी संपर्क साधून बनावट गिऱ्हाईक पाठवून या प्रकाराची खात्री करण्यात आली.
तिनेच २० ते २५ वयोगटातील चार मुलींना तिथे आणले. हा प्रकार उघड होताच या बनावट गिºहाईकाने इशारा केल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागासह श्रीनगर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करुन दलाल महिलेला ताब्यात घेतले. तेंव्हा तिच्या ताब्यातून एक हजारांची रोकड, पाच हजारांचा मोबाईल, पर्स आणि निरोधची पाकिटे असा सहा हजार ८४० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. तिला २८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी हे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.