मीरारोड - मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असल्याने फेसबुकवर मैत्री झालेल्या इसमाने मदतीच्या बहाण्याने महिलेस ८ लाखांना गंडा घातला. या प्रकरणी शुक्रवारी नवघर पोलिसांनी ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्टमध्ये राहणाऱ्या अलका पाटील (५२) ह्या गुरहिणीचे पती चंद्रकांत हे गेल्या वर्षी अभिनय विद्या मंदिर मधून शिक्षक म्हणून सेवा निवृत्त झाले आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. पतीच्या निवृत्ती वेतनावर घर चालत असल्याने मुलांच्या शिक्षणा करिता जास्त पैसे खर्च होत असल्याने आर्थिक अडचण असल्याचे अलका यांनी त्यांची फेसबुक वर मैत्री झालेल्या अनोळखी डॉ. रायन रोलांड नावाच्या व्यक्तीस सांगितले.
परदेशी क्रमांका वर व्हॉट्सअप चॅटिंग दरम्यान त्या फेसबुकच्या अनोळखी मित्राने आर्थिक मदत करतो असे अलका यांना सांगितले. पैसे पाठवण्यासाठी बँक खात्याची माहिती त्याने मागितली असता ती अलका यांनी दिली. त्याने बँक ऑफ लंडन मधून अलका यांच्या खात्यात ८० हजार पौंड ट्रान्सफर झाल्याचा फोटो व्हॉट्सअप वर पाठवला. मात्र नंतर अलका यांना कॉल करून परदेशातून पैसे पाठवले असल्याने प्रोसेसिंग शुल्क म्हणून पैसे भरावे लागतील असे सांगून अलका यांच्या कडून ऑनलाईन खात्यात तब्बल ८ लाख ९ हजार रुपये उकळले. ८० हजार पौंड मिळणार म्हणून अलका यांनी देखील त्यांच्या बँक खात्यातील रक्कम तसेच त्यांचे सोन्याचे दागिने गहाण ठेऊन अनोळखी फेसबुक मित्राने सांगितले त्या प्रमाणे विविध खात्यात पैसे भरले.
नंतर तुम्ही परदेशातून बेकायदेशीर पैसे ट्रान्सफर करत असल्याने पोलिसाना माहिती देऊ अन्यथा साडे सहा लाख रुपये द्या असे अलका यांना धमकावण्यात आले. अखेर आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर शुक्रवार १० फेब्रुवारी रोजी अलका यांच्या फिर्यादी वरून नवघर पोलिसांनी डॉ. रायन सह मिसेस निर्मला श्रीवास्तवा व आणखी दोघा मोबाईल क्रमांक धारकांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.