अकोला - येथील पोलिस लॉनमध्ये झालेल्या एका लग्न समारंभामध्ये अमरावती येथील वराच्या आईने स्टेजच्या बाजूला ठेवलेली पर्स चोरट्याने लांबविली. या पर्समध्ये ८० हजार रुपयांचे सोने व चांदीचे दागिने होते. ही घटना ७ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी २३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे.
अमरावती येथील टोपे नगरात राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी आनंद दमडुजी खुदरे (६७) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या डॉक्टर मुलाचे ७ फेब्रुवारी रोजी अकोल्यातील संजय इंगळे यांच्या मुलीशी लग्न झाले. हा लग्न समारंभ पोलिस लॉनमध्ये आयोजित केला होता. दुपारी १२ वाजता लग्न लागल्यानंतर नवरी-नवरदेव यांच्यासोबत पोलिस लाॅन येथील स्टेजवर दुपारी फोटो सेशन सुरू असताना त्यांची पत्नी स्नेहा खुदरे हिने तिच्या गळ्यातील लेडीज पर्स (बॅग) स्टेजच्या बाजूला ठेवली होती. या पर्समध्ये मोबाइल, चांदीची गणेशमूर्ती, कृष्णमूर्ती, अन्नपूर्णा मूर्ती वजन अंदाजे ७० ग्रॅम, सोन्याचे पेंडाल वजन ४ ग्रॅम, सोन्याची चेन वजन ९ ग्रॅम असा एकूण ८० हजार ५०० रुपयांचा ऐवज होता. ही पर्स अज्ञाताने लांबविली. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी २३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे.