जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: चारित्र्याच्या संशयातून ठाण्यातील २७ वर्षीय फॅशन डिझायनर तरुणीला चामडी पट्ट्याने, हातांनी आणि वरवंट्याने मारहाण करणाऱ्या आरिफ नाईक (वय ३४, रा. कोलबाड, ठाणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी गुरुवारी दिली.
आरिफ आणि या तरुणीचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. ९ जुलै २०२४ रोजी हे दोघेही त्यांच्या अन्य काही मित्र-मैत्रिणींसह पार्टीसाठी उपवन येथील एका हॉटेलमध्ये गेले होते. हे सर्वजण १० जुलै रोजी पहाटे ६:३० ते ६:४५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी निघून गेले. त्यानंतर आरिफ याने इतर मुलांशी का बोलतेस, असा संशय घेत वाद घालण्यास सुरुवात केली. या वादामध्ये त्याने तिला हाताने आणि त्याच्या पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीला तिच्या मैत्रिणीने विरोध केला. मात्र, त्याने तिचेही ऐकले नाही. त्यानंतर आरिफने किचनमधील वरवंटा तिच्या डोक्यावर मारला. त्यातच डोक्यातून रक्तस्राव झाल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी तिने त्याच्याविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे.