धुळे : शेतीच्या वादावरुन तरुणाला चौघांनी संगनमत करून मारहाण केली. यात लाठ्या-काठ्यांसह लोखंडी गजाचा वापर झाल्याने तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना साक्री तालुक्यातील हट्टी गावात शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी सोमवारी दुपारी निजामपूर पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
साक्री तालुक्यातील हट्टी गावात राहणारा देविदास भटा थोरात (वय ३५) याने निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, साक्री तालुक्यातील हट्टी गाव शिवारात देविदास थोरात यांची शेतजमीन आहे. या ठिकाणी शेतीचा वाद पेटलेला आहे. या वादावरुन चार जणांनी एकत्र येऊन थोरात यांच्याशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्याने एकाने लोखंडाचा गज काढून त्याच्याने मारहाण केली. दुसऱ्याने काठीने डोक्याला आणि पाठीवर हल्ला चढविला. देविदास यांची पुंजूबाई हिलाही मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जखमी अवस्थेत दोघांना सोडून चौघांनी पळ काढला. जखमी अवस्थेत दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर देविदास थोरात यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात सोमवारी दुपारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार चार जणांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस नाईक वाडीले घटनेचा तपास करीत आहेत.