दीपक दुपारगुडे, सोलापूर: बार्शी येथील बीई सिव्हील इंजिनियर तरुणील पुणे येथे नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून सव्वा लाख रुपये उकळून तिची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संतोष पोपट साळुंखे (रा.वाण्याची वाडी, मारुती मंदिर, मासूर, ता.कराड जि.सातारा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून वैदेही विवेक धर्माधिकारी (रा. बार्शी) या तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार १७ नोव्हेंबर २०२२ ते २ जानेवारी २०२३ या काळात घडला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार याप्रकरणातील संतोष साळुंखे याने मोबाईलवरुन तिच्याशी नेहमी संपर्कात राहून तो स्वत: एका मोठ्या कंपनीत पदावर काम करत असल्याचे सांगितले. तुम्हालाही पुण्याच्या आयटी कंपनीत नोकरी देतो, अनुभव प्रमाणपत्रसाठी २५ हजार व नोकरी आदेश दिल्यावर एक लाख हजार रुपये द्यावे लागतील म्हणाला. नोकरीच्या आशेवर असलेल्या या मुलीने बायोडाटा पाठवला. त्यानुसार ६ डिसेंबर २०२२ रोजी प्रमाणपत्र दिले.
पुण्याच्या आयटी कंपनीत नोकरी दिल्याचे पत्र ई मेलवर पाठवून त्यावरच ऑनलाइन वर्क फ्रॉम होम करण्याबाबत मेलवर कळविले. त्यानंतर नोकरीसाठी २९ नोव्हेबंर रोजी २५ हजार रुपये व ३० नोंव्हेंबर रोजी लाख रुपये त्याच्या खात्यावर जमा केले. परंतु त्यानंतर त्याने फोनवरील संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिसात धाव घेतली. तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करीत आहेत.