मुंबई - बांगलादेशातील गरिबी आणि उपासमारीला कंटाळून कुटुंबियांना मदतीचा हातभार लावण्यासाठी तरुणीने नोकरीसाठी धडपड सुरु केली. दलालाने मुंबईत चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवत मुंबई गाठली. मात्र, पहिल्याच दिवशी तरुणीचा दीड लाखांत सौदा करत तिला एका खोलीत डांबून बळजबरीने तिच्याकडून वेश्याव्यसाय करून घेतल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या कारवाईतून समोर आली आहे. गुन्हे शाखेने या तरुणीची सुटका करत तीन वेश्या दलालाना अटक केली आहे.
मूळची बांगलादेशातील रहिवासी असलेली २५ वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात असताना एका दलालाने तिला मुंबईत चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवले. दलालाच्या मदतीने मुंबई गाठली. आरोपीने मुंबईत उतरताच तरुणीचा दीड लाखांत सौदा करत तिला व्ही पी. रोड येथील, हाजी ईस्माईल इमारतीच्या तळ मजल्यावरील चार नंबर रूममध्ये कोंडले. त्या चार भिंतीआड तिच्यावर अत्याचार सुरु झाले. तेथे तिचा दीड लाखांत सौदा झाला असून वेश्याव्यवसाय करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. तिला मारझोड करत वेश्याव्यवसाय करून घेत होते. तिला बांगलादेशी भाषेशिवाय अन्य भाषा बोलण्यास जमत नसल्याने बाहेर पडण्यास मार्ग नव्हता. अशात, एका ग्राहका मार्फत तिने मदत मागितली.
ग्राहकाकडून एका सामाजिक संस्थेला तरुणीबाबत समजताच त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यानुसार, अंमलबजावणी कक्षाचे चंद्रकांत जाधव, प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार प्रजापतीसह अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पोलीस निरीक्षक अनिता कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब कानवडे, पोउनि योगेश कन्हेरकरसह तपास पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानुसार, छापा टाकून तरुणीची सुखरूप सुटका केली आहे. वेश्यादलाल सुधीर कुमार जगन्नाथ शर्मा (४२), योधान नागो यादव (३७) आणि मिथिलेश चेतू यादव (४७) या तिघांना अटक केली आहे. तसेच, तिचा सौदा करणाऱ्याचा शोध सुरु आहे. याप्रकरणी डी. बी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहे.