बांदा - उत्तर प्रदेशातील बांदा येथे आयुष्याला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने सुसाईड नोटही लिहिली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला. सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या क्रमांकावरून कुटुंबीयांना माहिती दिली. आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला.
घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये मृत व्यक्तीने लिहिले आहे की, माझ्या आई वडिलांना धीर द्या. मी गेल्या १६ दिवसांपासून मानसिक तणावाखाली जीवन जगतोय. मला सगळ्यांची खूप आठवण येत आहे. ती स्त्री (म्हणजे पत्नी) माझ्यासोबत गेली नाही यावर तुमचा आणि समाजातील लोकांचा आता विश्वास बसेल असं त्याने लिहिलंय. त्याचसोबत मुलासाठी तो भावूक झालेला दिसून आला.''माझ्या प्रिय मुला, मला माफ कर. मी तुझ्यावर प्रेम करतो. आई आणि बाबांची काळजी घे. खूप आठवण येतेय. काश! मी तुला शेवटच्या वेळी भेटू शकलो असतो असे वाटले असते. कधीही जुगार खेळू नका, जुगाराने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे त्यामुळे मी हे पाऊल उचलत आहे असं त्याने मुलाला सांगितले.
सोम प्रकाश उर्फ सोनू हा युवक फतेहपूर जिल्ह्यातील लालौली पोलीस स्टेशन हद्दीतील दतौली गावचा रहिवासी होता. त्याने मंगळवारी शहरातील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली. त्यानंतर बुधवारी तो न दिसल्याने हॉटेल मालकाला संशय आला. त्याने दरवाजा ठोठावला पण काहीच हालचाल झाली नाही. त्यानंतर हॉटेल मालकाने पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी दरवाजा उघडला असता सोनूचा मृतदेह बेडशीटच्या सहाय्याने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
सोनू अडीच वर्षांपासून परदेशात राहत होता. या काळात त्याने घरातील कोणत्याही सदस्याला फोन केला नाही. मृत युवकाला एक मुलगा व दोन मुली आहेत असं त्याचे वडील म्हणाले. दरम्यान, सोम प्रकाश उर्फ सोनू सिंग (वय 36) रा. दतौली, फतेहपूर हा एका हॉटेलमध्ये थांबला होता. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पाहिले असता त्याच्या रुमचा दरवाजा बंद होता. युवकाने चादरीच्या सहाय्याने पंख्याला लटकून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमधून नंबर काढून त्याच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील कारवाई करण्यात येत आहे असं डीएसपी सिटी गवेंद्र पाल गौतम यांनी सांगितले.