अमरावती: तुझ्याविरूध्द भोपाळच्या सायबर सेलमध्ये एफआयआर दाखल झाला असून, ते प्रकरण ॲडजेस्ट करण्याची बतावणी करून वरूड येथील एका तरूणाची ५२ हजार ८५० रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी त्या २० वर्षीय तरूणाच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी मध्यप्रदेशातील तिघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
व्हिडिओ कॉलवर बोलल्यानंतर वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून दोन्हीकडील व्यक्तींना नग्न असल्याचे भासवून हा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जात आहेत. तोच प्रकार वरूड येथील विरेंद्र नामक तरूणासोबत २६ नोव्हेंबर २०२२ रोजी घडला. वीरेंद्रने प्ले स्टोरमधून रॅंडम कॉल असे सर्च केले. त्यावेळी व्हिडिओ कॉल लाईव्ह टॉक हे ॲप डाऊनलोड करण्याची सुचना पलिकडून करण्यात आली. ते ॲप डाऊनलोड करून वीरेंद्र हा एक मुलीसोबत व्हिडिओ कॉलवर बरेच काही बोलला. त्यानंतर त्याला एफआयआरची धमकी देऊन त्याच्याकडून रक्कम उकळण्यात आली. याप्रकरणी २३ जानेवारी रोजी वरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अशी झाली फसवणूक
त्या अज्ञात मुलीशी ‘व्हीसी’वर बोलल्यानंतर अन्य एका आरोपीने वीरेंद्रला कॉल करून शिविगाळ केली. तू डेटींग ॲपचा वापर करतो, तुझ्याविरूदध दिल्लीवरून सायबर सेल भोपाल येथे फॅक्सवर एफआयआर झाली आहे. ते प्रकरण ॲडजस्ट करण्यासाठी त्याला पैशाची मागणी करण्यात आली. आपण डीएसपी संदिप राणा बोलतोय, अशी बतावणी करून त्याला युपीआयवर ५२८५० रुपये पाठविण्यास बाध्य करण्यात आले.
सेक्सटॉर्शन म्हणजे काय?
एक्सटॉर्शन म्हणजे खंडणी आणि त्याचप्रमाणे लैंगिकतेचा आधार घेऊन किंवा लैंगिक छळ केल्याचा बनाव करून उकळली जाणारी खंडणी म्हणजे 'सेक्सटॉर्शन'. एखाद्या व्यक्तीचा फोटो अथवा व्हिडीओमध्ये छेडछाड करून त्याला नग्न करून हा फोटो किंवा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचे प्रकार वाढले आहेत.
हे अवश्य ध्यानात ठेवा
समाज माध्यमांवर अनोळखी व्यक्तीसोबत जपून मैत्री करा. अनोळखी व्यक्तीचे 'व्हिडीओ कॉल' स्वीकारू नका. अनेकदा तरुणांना फसवण्यासाठी आकर्षक तरुणींच्या चेहऱ्याचा वापर होतो. एखादा 'न्यूड कॉल' चुकून स्वीकारला तर अधिक काळ बोलू नका. लैंगिक छळाचा आरोप, बदनामीची भीती दाखवून पैशाची मागणी होते. खंडणी मागितल्यास आर्थिक व्यवहार करू नका.