लोणी काळभोर : लोणी काळभोर येथे मद्यधुंद अवस्थेतील महिलेने पोलीस महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. ही घटना रविवारी(दि. ३१) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका रावसाहेब धावडे यांनी फिर्याद दिली आहे.आरोपी महिलेविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहा योगेश पारखे (सध्या रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर, मुळ रा. भिमनगर, दौंड, ता. दौंड )असे महिला आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ही महिला रस्त्यावरून ये - जा करत असलेल्या वाहनांना हात करून थांबण्याची विनंती करत असत. वाहनाचा वेग कमी होताच ती चालकाला मारहाण करत होती. ही घटना लक्षात आल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याने तिला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात चल म्हटले याचा राग मनात धरुन आरोपी महिलेने पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली.आरोपी नेहा ही गुन्हा दाखल होण्यापुर्वीच फरार झाली असून आठ महिन्यांपूर्वी दारुच्या नशेत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वरील प्रमाणेच गोंधळ घातल्याची तक्रार आहे. ही महिला एका दुचाकीस्वाराला मारहाण करताना आढळल्यावर पोलीस पथकाने तिला अडवून रस्त्यावरून बाजूला होण्यास सांगितले. हे ऐकताच ती शिवीगाळ करू लागली. प्रियंका धावडे यांनी तिला नाव विचारले असता तिने नेहा पारखे असे सांगितले. यानंतर धावडे यांनी तिला सरकारी गाडीत बसण्यास सांगितले. यावेळी तिने मी गाडीत बसणार नाही. तुला काय करायचे ते कर असे म्हणून धावडे यांचे केस पकडले व रस्त्यावर पाडले. महिला कर्मचा-यांस मारहाण होत आहे. ही मारहाणीचे चित्र पाहून सहकारी पोलीस कर्मचारी तिकडे जावू लागले. त्यावेळी ही महिला अंधाराचा फायदा घेवून पळून गेली. पोलीस पथकाने तिचा शोध घेतला. परंतू ती अद्याप सापडलेली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या पारखे या महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित महिलेला अटक करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या आहेत. यापूर्वी पोलिस ठाण्याच्या आवारात दारुच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या स्थानिक पुढाऱ्याला योग्य ती समज देण्यात आली असून, याबाबतची माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे. कायदा व सुवस्था राखणे पोलिसांचे काम असुन, यात गडबड अथवा लुडबुड करण्याचा प्रयत्न करणाºयांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही.
लोणी काळभोर येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 6:45 PM