ठाणे : चार लाखांच्या कर्जावरील व्याजाच्या वसुलीसाठी ठाण्यातील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याला एका खोलीत डांबून ठेवले होते. तिथेच वायर आणि हॉकी स्टिकने त्याला जबर मारहाणही करण्यात आली. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी बाबा ऊर्फ रमजान शेख याच्यासह तिघांना गुरुवारी अटक केली आहे.
चरईतील मिष्टान्नाचे विक्रेते राजेश भगलानी (३९) यांनी व्यवसायात तोटा झाल्याने बाबा ऊर्फ रमजान शेख (रा. हाजुरी, ठाणे) यांच्याकडून चार लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याबदल्यात चार हजार रुपये रोज देण्याचे ठरले. मात्र, रमजान यांनी त्यांच्याकडून आठ लाख रुपये घेतल्याचे नोटरीवर लेखी घेतले. त्यानंतर ८० दिवस रमजान यांना त्यांनी रोज चार हजार रुपये दिले. पुढे त्यांची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे त्यांनी ते पैसे देणे बंद केले. पैसे देणे बंद केल्यामुळे रमजान याने मारहाण करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी २३ डिसेंबर २०२० रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाही दाखल केला. त्यानंतरही त्याने पैसे मागण्यास सुरुवात केली. २३ मार्च २०२१ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास राजेश हे त्यांच्या जांभळीनाका येथील दुकानात असताना त्यांचा मित्र विक्रांत ऊर्फ वाल्मीकी उमेर यास ताब्यात घेऊन त्याच्या मार्फत रमजान याने वागळे इस्टेट येथील गोपाळआश्रम हॉटेल येथे बोलवून घेतले.
तिथे त्याच्या मोटारकारमधून नजीर शेख, शाहरुख शेख आणि खाजा शेख आदींनी राजेश यांना गाडीत कोंबून हाजुरीतील एका खोलीत डांबून ठेवले. तिथे पैशांची मागणी करून वायर आणि हॉकी स्टिकने जबर मारहाण केली, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याचीही धमकी दिली. तेथून सुटका करून घेतल्यानंतर याप्रकरणी २४ मार्च रोजी राजेश यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीया घटनेमुळे ठाणे शहर आणि परिसरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. .
आरोपींना २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी याप्रकरणी सावकारी कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या पथकाने २५ मार्च रोजी रमजान, नजीर आणि शाहरुख या तिघांना अटक केली. त्यांना २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.