ठाणे : दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असून पेपर देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ठाण्यातील दोन मुली अद्यापही घरी परतल्या नसल्याची बाब पुढे आली आहे. या घटना ५ ते १८ मार्चदरम्यान घडल्या आहेत. या प्रकरणी एकाच दिवशी अपहरणाचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.बारावीतील मुलगी ही १८ वर्षीय असून, ती ५ मार्च रोजी सकाळी ८ वाजता भावाला परीक्षेला जात असल्याचे सांगून गेली होती. तिचा पेपर सुटल्यानंतर दुपारी २ला तिचा भाऊ व त्याचा मित्र तिला घेण्यासाठी मुंबईतील कॉलेजमध्ये गेले होते. पेपर सुटल्यावर ती कॉलेजच्या मैदानामधून बाहेर येताना झालेल्या गर्दीत गायब झाली. अवधेश सरोज नामक तरुणाने तिला आपण उत्तर प्रदेशमध्ये नेल्याचे फोन करून सांगितल्याचे मुलीच्या भावाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.दुसऱ्या घटनेत दहावीतील मुलगी ही १६ वर्षीय असून ती १८ मार्च रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पेपर देण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. ती सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने तिला कोणीतरी पळवून नेल्याचे तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले.
परीक्षा देण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थिनींचे अपहरण, पोलिसांकडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 6:42 AM