सांगली - गेल्या वर्षभरापासून अवैधपणे गर्भपात करणाऱ्या डॉ. रुपाली चौगुले हिला पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. छातीत वेदना होत असल्याने ती एका खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. सांगली शहर पोलिसांनी तिला रुग्णालयातूनच ताब्यात घेतल्यामुळे या प्रकरणाचा चौकशी आणि तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.
चौगुले हॉस्पिटलमधल्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील संशयित डॉक्टर रुपाली चौगुले आणि तीचा पती विजयकुमार चौगुले हे दोघेही शासकीय सेवेत होते आणि गेल्या वर्षांपासून त्यांचा सांगलीत गर्भपाताचा बेकायदा धंदा सुरु असल्याची धक्कादायक माहिती काल उघडकीस आली होती. चौगुले हॉस्पिटलमध्ये छापा टाकल्यानंतर पोलिसांना तेथे अनेक आक्षेपार्ह कागदपत्रं आणि दारूच्या बाटल्या, औषधं आढळून आले. छाप्यात हस्तगत करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर या डॉक्टर दाम्पत्याने या ठिकाणी नऊ बेकायदेशीर गर्भपात केले असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतर पोलिसांनी रुपाली चौगुले आणि तीचा पती विजयकुमार चौगुले यांच्यासर आणखी एकावर गुन्हा दाखल केला. सांगली सिव्हीलचे अधीक्षक डॉ. सुबोध उगाणे हे सुद्धा या रुग्णालयात येत असल्याचे समोर आले असून डॉ. उगणे हे आता या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनाही नोटीस पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.