ठाणे - घोडबंदर रोड भागातील कुख्यात गुंड चिन्मय शिंदे याला कासारवडवली पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्याला 27 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.घोडबंदर रोड येथील एक रहिवाशी हिरानंदानी इस्टेट येथील ‘द वॉक’ येथे 6 एप्रिल 2019 रोजी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास आले होते. त्यावेळी कुख्यात गुंड शिंदे याने त्याच्या अन्य साथीदारांसह या रहिवाशांवर चॉपरने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर हे टोळके तिथून पसार झाले होते. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कासारवडवली पोलिसांनी यातील प्रसाद पालांडे, राजकुमार यादव आणि कृष्णा कांबळे यांना तात्काळ अटक केली होती. या घटनेनतर चिन्मय मात्र पसार झाला होता. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. स्थानिक रहिवाशांमध्ये त्याची दहशत होती. तो घोडबंदर परिसरात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने त्याला 22 सप्टेंबर रोजी अटक केली. त्याच्या आणखीही इतर फरार साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कुख्यात फरार गुंड चिन्मय शिंदे जेरबंद; कासारवडवली पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 9:20 PM
27 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठळक मुद्देकासारवडवली पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या आणखीही इतर फरार साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.