मंगेश कराळे
नालासोपारा - ठार मारण्याच्या उद्देशाने तलवारीने प्राणघातक हमला करून फरार असणाऱ्या दोन आरोपींना तुळींज पोलिसांनी अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी गुरुवारी दिली आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपींना तुळींज पोलीस केव्हा अटक करणार याकडे नालासोपारा वासियांचे लक्ष लागून आहे.
संदल मिरवणुकीत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून नालासोपारा येथे प्रगती नगर येथील रिया अपार्टमेंटमधील हुसेन अब्दुल रहमान शेख (३१) यांच्यावर तलवारीने हल्ला केल्याची घटना १ ऑगस्टला झाली होती. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी मंगळवारी भारतीय हत्यार कायदा कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्राचे गांभीर्य लक्षात घेवुन वरिष्ठांनी आरोपींचा शोध घेवुन त्यांना तात्काळ अटक करणेबाबत मार्गदर्शन व सुचना केल्या होत्या. तुळींज पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी सलमान जमील खान उर्फ मेंटल (२४) याला म्हाडा कॉलनी विरार येथुन व दुसरा आरोपी अभिजीत महेंद्र टांग (२१) याला वसई माणिकपुर येथुन ताब्यात घेवुन दोन आरोपीला अटक करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांचे मार्गदर्शनाखाली तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमरसिंह पाटील, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, पोलीस हवालदार आनंद मोरे, उमेश वरठा, केंद्रे, कदम यांनी केलेली आहे.