विरार - एका सराईत गुंडाने नवी मुंबई पोलिसांवरगोळीबार करून पलायन केले आहे. विरारच्या खानिवडे टोलनाक्यावर रविवारी रात्री ही घटना घडली फैय्याज शेख असे या आरोपीचे नाव असून त्याचा शोध सुरू आहे. गोळीबाराच्या हल्ल्यात सापडलेला पोलीस थोडक्यात बचावला आहे.
फैय्याज खलील शेख हा घरफोडी आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये नवी मुंबई पोलिसांना पाहिजे होता. त्याला पकडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथक विरारमध्ये आले होते. रविवारी रात्री विरारच्या खानिवडे टोल नाक्यावर पोलीस त्याला पकडत असताना शेखने या पोलिसांच्या पथकावरच बेधुंद गोळीबार केला आणि आपल्या वाहनातून पळून गेला. या कामात त्याची पत्नी आणि आईने त्याला मदत केली. शेख याने केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक सुरवसे, सहाय्यक पोलीस फौजदार तायडे किरकोळ जखमी झाले आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून त्याच्या आई आणि पत्नीला विरार पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यानी दिली.