रायगड : काेराेना कालावधीत अलिबाग नेहुली क्रीडा संकुलमध्ये तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या कारागृहातून फरार झालेल्या कैद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने नालासाेपारा येथुन साेमवारी पहाटे मारुती दगडे याला अटक केली.
अलिबाग जिल्हा कारागृहातील कैद्यांची 5 जुलै रोजी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर 69 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समाेर आले हाेते. यामध्ये पोस्को कायद्या अंतर्गत न्यायालयीन कोठडीत असलेला मारुती दगडे यालाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्व कैद्यांना अलिबाग तालुक्यातील नेहुली क्रीडा संकुल येथील तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या कारागृहात ठेवण्यात आले होते. 21 जुलै रोजी दगडे याने सगळ्याची नजर चुकवून खिडकीचे गज कापून मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पलायन केले हाेते. त्यानंतर मारुती दगडे याचा शोध अलिबाग पोलिसांकडून सुरू होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला आरोपी दगडे हा जेजुरी परिसरातील डोंगराळ भागात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने दोन दिवस जेजुरी, सासवड, फलटण भागात आरोपी याचा शोध घेतला तेथूनही तो निसटला होता.आरोपी हा निपाणी जि. बेळगाव राज्य कर्नाटक येथे गेला असल्याचे पथकाला समजले. आरोपी मारुती दगडे हा धनगर समाजातील असल्याने तो निपाणी येथे बाळुमामाची मेंढरे याची पुजा करण्यासाठी गेला असल्याचे सदर पथकास समजले. पथकाने निपाणी येथे जाऊन वेषांतर करुन धनगर लोकांसोबत राहुन आरोपी दगडे याची माहिती प्राप्त केली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा नालासोपारा येथे लपून बसला असल्याचे समजले. त्यानुसार सहायक पाेलिस निरीक्षक धनंजय पोरे व त्यांच्या तपास पथकाने आरोपी दगडे याचा नालासोपारा तुळिंज परिसरात शोध घेऊन त्याला साेमवारी 16 ऑगस्ट रोजी पहाटे अटक केली.